Posts

Showing posts from May, 2022

सांज बावरे

सांज बावरे ...कातरवेळ  अंधार उजेड पाठशिवणी खेळ  रंग उतरे ..स्वप्नखेळ... आत आत...उरी घालमेल.... मन मन ...भारले क्षण.. तन तन ...रेशिम कण.... सय सय धावरी गाय.. आठवणींवर नवी साय..... बागड बागड मनाचा पक्षी.. काढ काढ नवनवी नक्षी.. नाच नाच अंगणी धारा फुलव फुलव प्रेमपिसारा... उगव उगव नवा चंद्र झुरव झुरव ..मनाचा इंद्र.. भार भार ..माथ्यावर घाव.. पार पार ..रोज नवा गाव.... धाव धाव वेडा ध्यास.. थांब थांब हा स्वप्न भास... जग जग श्वासप्रश्वास.... नको नको तो उपहास... उघड उघड शिळा उघड.. जगणं शोध सुघड सुघड... बेरीज बेरीज जोडत चल.... वजा वजा गाळत चल...... आपलं म्हणून जपत चल.. परकं तेवढं सोडत चल .... राम इथेच..कृष्ण इथेच.... सर्वगामी शोधत चल.... अपर्णा भागवत  एन 88 अनूपनगर इंदूर (म प्र)

जीवनभान

आरस्पानी स्वप्नांच्या शुभ्र महालात मी स्वतःला बंदिस्त केलं...  सार-या  हिरव्या वाटा पायतळी घातल्या... गर्द रात्रीच्या मांडीवर बसून चांदण्यांचे  अवघे गावच आपलेसे केले.. चंद्रही कलंकहीन मला खुणावत राहिला.. सूर्याच्या दिप्तीनंही सुखावलो ... नी मी तप्तहीन प्रवास सुरू केला.... अवघी स्वःप्नांची नि सुखाची कारंजी  अंगावर घेऊन मी सुखाचा घेतला निरंतर शोध... मी सुखावलो असंही वाटलं.. त्याच क्षणाला माझ्यातला सिध्दार्थ जागा झाला... 'तू जगलास खरंच ? ' प्रश्नानं उभं राहिलेलं प्रश्नचिन्हांचं आवर्त 'अरे ते सुख नव्हतं ..सुखाचा आभास मात्र!' 'दुःख न पाहिल्यानी जगातील दुःख संपत नसतात....' मला आत आत गलबलून आलं.. माझ्या अस्तित्वगर्भातून आलेलं जीवनभान घेऊन  मी आता निघालोय नव्या वाटेवर.... जिथं सुखदुःखाच्या धुसर क्षितिजरेषेपर्यंत  मला घेता येतो माझाच शोध.... ठेचाळलेल्या वाटेवरही.... अपर्णा भागवत  एन 88अनूपनगर  इंदूर (म प्र )