Posts

Showing posts from April, 2022

मृगजळ

Image
  मंद मंद समीर माझ्या कानात काही कुजबुजला... तुझ्या आठवणींशी खेळत राहिला.. सकाळी पाहिलं अंगणात केशरी सडा शिंपून  पारिजात दारी फुलला होता... ही चंद्रभोगी यामिनी मनाच्या गवाक्षी उभी राहिली. चंद्रकळा नेसून  ... तुझ्या धुंद मोरपिसी स्पर्शाचं आवर्त  मनात भिरभिरत राहिली अगणित तारकांनी भरून गेलं माझ्या मनाचं नभांगण.... तुझ्या रंगगंधाचा केशरी उत्सव  प्राचीच्या क्षितिजावरून पाहतांना  आठवणींचा समुद्र  ते निरामय केशरी प्रतिबिंब धारण करणारा तपस्वीच वाटला मला... त्या निःशब्द गंधित हवेत मनाची राधिका कृष्णमय झाली रे.... आता हा माथ्यावरचा सूर्य तळपून  तुझ्या आठवणींचं दहनच  करायला निघाला या उजाड माळावर विसंबून ..... तेव्हा समजलं.. हे मनाचं आभाळंच फसवं मृगजळ आहे.... हे मनाचं आभाळच एक फसवं मृगजळ आहे..... अपर्णा भागवत एन 88अनूपनगर इंदूर (म प्र)

जगणं काही उरलंच तर

Image
  जगणं काही उरलंच तर राखून ठेव श्वासांसाठी... संथ जलाशय आटले तरी राखून ठेव डोळ्यांसाठी... ओसाड रेत,उजाड माळ, वैराण वाळवंटापोटी.. उरलेच काही मृगजळ तर राखून ठेव तृष्णेसाठी.... अशा उन्हात,कोरड्या रानात अनवाणी जायचे तर... राखून ठेव काही झाडं दुपारच्या सावलीसाठी ... नातीगोती हरवली,सारी माणसं परागंदा  झाली... तर राखून ठेव थोडी उब उरातल्या आतड्यांसाठी... इथल्या जंगलात आपलीच माणसं श्वापदं झाली तर  राखून ठेव थोडी धार तलवारीला प्रतिकारासाठी..... रात्र असली वैर-यासारखी तरी राखून ठेव चांदण्यांसाठी... राखून ठेव थोडं आकाश थकलेल्या गात्रांच्या विसाव्यासाठी... अपर्णा भागवत  एन88 अनूपनगर  इंदूर (म प्र)

सिंधुताई

Image
  सिंधुताई म्हणजे करुणेचा सागर आईपणाचा अखंड जागर मातृहृदयाची चीरवेदना अंतरी उमलून येणारी चेतना सिंधुताई म्हणजे सीतेच्या वाट्याला आलेलं प्राक्तन... चिंधीच्या रूपानं जगलेलं वास्तव.. अंगभर चिंध्या लेऊनही फुलणारं वैभव.. राजप्रासादालाही लाजवेल असं भावना संवेदनांचं गाव... सिंधुताई म्हणजे साफल्याचा समुद्र  कवितेच्या सागरातून वेचलेले  शिंपले ..मोती...नातीगोती... त्या समुद्राच्या आत्ममंथनातून ... गवसलेल्या अमृतातून अमृतमय झालेलं जीवन...  अपर्णा भागवत 

पायवाट

Image
  काळ्या कुळकुळीत चमकदार नागमोडी सडकेनं आत्मप्रौढीनं तुडूंब भरून, आपल्या शेजारुन जाणार-या  पायवाटेला म्हटलं- "बघ...माझं वैभव हजारो सुंदर सुंदर गाड्या  सुळसुळीत धावतात. . चारचाकी ,दुचाकी दिमाखात  माझ्या या सुंदर सडकेवर  ये-जा करतात. अनवरत रहदारीनं  माझा जीव कसा  फुलून जातो..." पायवाट उत्तरली- "खरंय तुझं म्हणणं.. पण नसेना का रहदारी  मला माणसांचा वावर मिळतो. मुलं ,माणसं,कुटुंब  सुखानं माझ्या अंगाखांद्यावर खेळतात निश्चिंतपणानं.. एखादी खिल्ल्रारी बैलगाडी... टांगा...त्या गोजिरवाण्या सायकली व मूलं... कामावर जाणारे ..परतणारे  ते कामकरी शेतकरी... तुझ्या रस्त्यावरून धावणार-या  वाहनांची नि हैवानांची  भिती वाटलीच तर माझ्या आडोशाला येणारी एखादी भयभित तरूणी.. माणसांना निर्भय करून  प्रेम देण्यातच  माझी सार्थकता वाटते मला... मी नसेन शहरी  पण तुझ्याही सीमेपार  माणसं वाचत  जगतअसते मी माझ्या स्वप्नप्रदेशात....." अपर्णा भागवत

आभाळ मोकळे झाले

Image
मळभ दाटुनि आले नि डोळ्यात साठले  भरून आले आभाळ पापण्यात विसावले चमकली वीज जशी ती हृदय भेदले  वारा चहु दिशांनी भिरभिरे मन थैमानले.. पाऊस कोसळे धो-धो...मनांगण चिंबले  सैराटल्या स्मृतींनी नदी-नाले तुडूंबले  गडगड ढगात वाजे..हृदयी धडधडले मनातले कोवळे पक्षी...घरट्यास आसावले .. कोंदले आकाश दशदिशांनी धरतीस वेढले  पाशांनीआठवणींच्या मज सारखेच बांधले... कधी आभाळ भरून आले कधी आभाळ मोकळे झाले प्राणातले संगीत उजळून ...श्वासात भरूनि आले... अपर्णा भागवत  एन 88 अनूपनगर  इंदूर म प्र