पायवाट


 

काळ्या कुळकुळीत

चमकदार नागमोडी सडकेनं

आत्मप्रौढीनं तुडूंब भरून,

आपल्या शेजारुन जाणार-या 

पायवाटेला म्हटलं-

"बघ...माझं वैभव

हजारो सुंदर सुंदर गाड्या 

सुळसुळीत धावतात. .

चारचाकी ,दुचाकी दिमाखात 

माझ्या या सुंदर सडकेवर 

ये-जा करतात.

अनवरत रहदारीनं

 माझा जीव कसा 

फुलून जातो..."

पायवाट उत्तरली-

"खरंय तुझं म्हणणं..

पण नसेना का रहदारी 

मला माणसांचा वावर मिळतो.

मुलं ,माणसं,कुटुंब 

सुखानं माझ्या अंगाखांद्यावर

खेळतात निश्चिंतपणानं..

एखादी खिल्ल्रारी बैलगाडी...

टांगा...त्या गोजिरवाण्या

सायकली व मूलं...

कामावर जाणारे ..परतणारे 

ते कामकरी शेतकरी...

तुझ्या रस्त्यावरून धावणार-या 

वाहनांची नि हैवानांची 

भिती वाटलीच तर

माझ्या आडोशाला येणारी

एखादी भयभित तरूणी..

माणसांना निर्भय करून 

प्रेम देण्यातच 

माझी सार्थकता

वाटते मला...

मी नसेन शहरी 

पण तुझ्याही सीमेपार 

माणसं वाचत 

जगतअसते मी

माझ्या स्वप्नप्रदेशात....."


अपर्णा भागवत

Comments

Popular posts from this blog