nisargotsav

आम्ही इथे आल्यापासून एक निराळच  जग उलगडतय माझ्यासमोर …. खूप मोठमोठाले उंच वृक्ष
आणि हिरवे वस्त्र पांघरून असलेले अशोक, पिंपळ,कडूनिंब … आणि कितीतरी डेरेदार वैभवशाली
झाडं आपला हरितोत्सव साजरा करीत असतात ऋतू येतात आणि जातात …।ऋतूंच्या आगमनासोबत
ते नवीन तेज ,नवी झळाळी धारण करतात .. नवीन ऋतूच स्वागत किती आणि कसं करू असं होतं त्यांना………… त्यांच्या उत्सवी उत्साहाला तर सीमाच नाही....  . वाऱ्याच्या स्पर्शाने ती भावसमाधीत मग्न
झाल्यासारखी डोलू लागतात त्यांचे हिरवे टोकं झोके घेऊन आकाशालाही झुलवायला निघतात तेव्हा सामान्यांच्या दुर्दम्य महात्वाकांक्षाचीच  आठवण होते . हे वृक्ष मला मानवतेचे पुजारीच वाटतात ,
कारण अशा अदम्य प्रेमभावनेशिवाय काय असं डोलता येइल ?हसता येईल ?
सृष्टीत स्वतःला विसर्जित करण्याची त्यांची शक्ती अदभूत आहे .त्यांचं वेगळं असं अस्तित्व नाहीच ..... हिरवेपण धारण केलेलं ते पार्श्वभूमीला माथी धरून ...आभाळ पांघरायचं ते सोबतच्या चराचराचे अस्तित्व स्विकारून .... त्यांच्या रंगगंधांचं जितकं कोडकौतूक करावं तेवढं कमीच ....... हिरवेपणाचे रंग तरी किती वेगळे .पण विसंगती नाही . प्रत्येक जण दुसऱ्यात मिसळून गेलेला ... आकार वेगळे ..गूण वेगळे .... रूप वेगळे ...
 गीत वेगळे .... पण सहअस्तित्वाचा प्रचंड गतिमान स्त्रोत त्यांच्या नसानसातून वहात असतो . पर्वत नद्यांना रेखांकित करतात तर नद्या किनाऱ्याना ... किनारे वृक्षवल्लरींना ..... वृक्ष हिरव्या, करड्या गंधमयी पृथ्वीला ...पृथ्वी अथांग आभाळाला ... आभाळ मेघांना ...... मेघ क्षितिजाला ..... क्षितिज अथांगतेला ...अनंताला रूपांकित करतात .... आणि त्या अनंत चित्रकाराच्या रुपमाधुर्यात स्वतः.ला आपल्या रूपगंधाचं सौंदर्य जगून -जोपासून स्वतःला एकाकार करतात .......
  

Comments

Popular posts from this blog