श्रावणकिमया
अचानक आभाळ गर्द झालं . धुक्याची चादर लपेटल्यागत आभाळानं धूसरपणा पांघरला नि
चहूंकडून अंधारून आलं . अशावेळी पूर्वजन्माच्या सावल्या मनावर ठिबकाव्यात तसं मन
दाट अंधारून जातं . पण या पाऊसवेणा असतात . तप्त धरित्रीच्या कुशीला शांत करणाऱ्या
पावसाला त्यांत निमंत्रण असतं .... अबोल नि मूक निमंत्रण ..... धरेच्या मूक निमंत्रणाचा
स्वीकार करून आभाळ वेडं वेडं होतं ....त्याचं मन सुपाएवढं होतं ...झांज ,टिपऱ्या नि ढोलक
घेऊन तो स्वागतातूर मेघ धरित्रीला एखाद्या प्रियकराच्या ओढीनं भेटायला निघतो नि ती 
एका क्षणात चिंब भिजून जाते .... पाऊस कसा धोधो कोसळू लागतो ...जलतुषार अगदी
बारीक पण वेगाने आकाशाच्या चाळणीतून समत्वबुद्धीने ताल नि सूर लयीमध्ये घोंघावत
झेपावतात . त्याचा आसमंत व्यापून टाकणाऱ्या ताल ,गती आणि लयीन आदिमकाळापासून
आजतागायत चराचर सृष्टीला वेड लावलं आहे .
विजेच्या गडगडाटाने पावसाला शिवशंकराच्या प्रलयनृत्याचं प्रतिमान येतं .. प्रवाही मी ,प्रमत्त
मी असं म्हणत हे निसर्गाचं शिवतांडव खूप वेळपर्यंत चालू राहिलं तर सुरक्षिततेच्या कायम
कवचात लपेटलेल्या माणसाला क्षण दोन क्षण भेदरल्यासारखं होतं पण त्यात हळूहळू
मेघगर्जनेची झांज पण साथ देऊ लागते ...पावसाच्या टिपऱ्या आपल्या टपटपण्यानं साऱ्या
सृष्टीचा तोल सावरल्या सारख्या वाजत असतात . त्या टिपऱ्यांमध्ये नृत्य असतं सृजनाचं ....
नृत्य असतं आनंदाचं ...नृत्य असतं वेदनेचं ...नृत्य असतं मिलनाचं ..नृत्य असतं वियोगाचं ...
नृत्य असतं जन्माचं ..नृत्य असतं मृत्यूचं ......नृत्य असतं असीम जीवनोत्साहाच ....




Comments

Popular posts from this blog

पायवाट